कर्म आणि कर्मकांडे...


मनुष्याला दैववादापासून कर्मवादाकडे नेण्याचे काम भगवान श्रीकृष्णांनी केले; परंतु आज त्याच्या ग्रंथाचे पारायण करणारे नेमक्या उलट दिशेने प्रवास करीत असल्याचे दिसते. अगदी मध्ययुगीन काळापासून भारतात दैववाद फोफावला आहे. तो का फोफावला? त्यात कुणाचा स्वार्थ दडला होता? हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो; परंतु एक बाब सत्य आहे, की जगाच्या पाठीवर भारतीय लोक जितके दैववादी आहेत तितके इतर कोणत्याच देशातील नसतील किंवा नाहीतच

          
भगवद्गीता हा एक प्रमुख धर्मग्रंथ आहे, असे मानणाऱ्यांची आणि गीतेत जीवनाचे सार सामावले आहे, अशी श्रद्धा असणाऱ्यांची संख्या या देशात विपुल आहे. या ग्रंथाचे आणि या ग्रंथावर आधारित अन्य धर्मग्रंथांचे सप्ताह, पारायणे वगैरे आपल्याकडे नेहमीच सुरू असतात; परंतु गीतेचे पारायण करणे वेगळे आणि गीता समजून घेऊन ती आचरणात आणणे खूप वेगळे. दुर्दैवाने असे म्हणावे लागते, की या देशात गीतेचा खरा अर्थ समजून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे आणि हे आजचे आहे असे नाही, गेल्या शेकडो वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून अनेक विषयांवर भाष्य केले आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात, त्यावरून बरेचदा वाद देखील झाले आहेत; परंतु *गीता हा आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करित असतांना प्रामुख्याने कर्मयोगयुक्त परमेश्वराची एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्तिचा उपदेश करणारा ग्रंथ आहे*, हे मान्य करावे लागेल. *समोर लढणारे आपले आप्तस्वकीयच आहेत, हे पाहून शस्त्रे खाली टाकणाऱ्या अर्जुनाला समोर कोण आहे, काय केल्याने काय होईल वगैरेचा विचार न करता तू एक क्षत्रिय आहे आणि लढणे हा क्षत्रियाचा धर्म आहे, एवढेच लक्षात ठेव आणि त्यानुसार आचरण कर, असे सांगणारे श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्यांनाच कर्म करण्याचा संदेश देत आहेत*. याचा सरळ अर्थ माणसाने त्याच्याकडून अपेक्षित असलेले निहित कर्तव्य पार पाडावे, बाकी गोष्टींचा विचार करू नये असाच होतो. थोडक्यात काय तर *मनुष्याला दैववादापासून कर्मवादाकडे नेण्याचे काम श्रीकृष्णाने केले*; परंतु आज त्याच्या ग्रंथाचे पारायण करणारे नेमक्या उलट दिशेने प्रवास करीत असल्याचे दिसते. वर म्हटल्याप्रमाणे हा आजचा आजार नाही. अगदी मध्ययुगीन काळापासून भारतात दैववाद फोफावला आहे. तो का फोफावला? त्यात कुणाचा स्वार्थ दडला होता? हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो; परंतु एक बाब सत्य आहे, की जगाच्या पाठीवर भारतीय लोक जितके दैववादी आहेत तितके इतर कोणत्याच देशातील नसतील किंवा नाहीतच. ज्या देशाने जगाला गीतेसारखे अमूल्य तत्त्वज्ञान दिले त्याच देशात त्याच गीतेची इतकी उपेक्षा होणे दुर्दैवीच म्हणावे लागेल. असे म्हणतात, की *गझनीचा महमूद जेव्हा सोमनाथचे मंदिर लुटण्यासाठी आला तेव्हा त्याला मध्ये कुणीच प्रतिकार केला नाही आणि सोमनाथमध्ये दाखल झाल्यावरही त्याच्या विरोधात लढायला कुणीच समोर आले नाही. हा मेहमूद सोमनाथवर स्वारी करणार ही बातमी त्यावेळी गुप्तचरांनी तेव्हाच्या राजाला दिली होती, त्यावेळी मेहमूदसोबत लढण्याची तयारी करण्याऐवजी त्या राजाने आपल्या सल्लागारांच्या सल्ल्याने होमहवन, यज्ञयाग सुरू केले. या यज्ञयागामुळे देशावर येणारी परचक्राची पीडा आपोआप दूर होईल, हा सल्ला त्या राजाला देण्यात आला आणि त्यानेही त्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे व्हायचे तेच झाले. मेहमूद सोमनाथमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्या राजाने पळ काढला आणि कोणत्याही प्रतिकाराविना मेहमूदने सोमनाथची लूट केली. त्यानंतर पुढचे जवळपास सात-आठशे वर्षे या देशावर मोगलांचे साम्राज्य कायम राहिले. त्या साम्राज्याला पहिला तडाखा दिला तो शिवाजी महाराजांनी, हा इतिहास आहे*.
           
सांगायचे तात्पर्य दैववादी मानसिकतेमुळे या देशाचे आतापर्यंत प्रचंड नुकसान झाले आहे. या देशातील लोकांची लढण्याची म्हणजेच कर्मवादाची क्षमताच या दैववादाने आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कर्मकांडाने पंगू करून टाकली. लढण्याची क्षमता म्हणजे केवळ रणांगणावर जाऊन शत्रूसोबत दोन हात करण्याची एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही, एकूणच जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी जी हिंमत लागते, परिस्थितीवर मात करण्यासाठी जी चिकाटी, कठीण परिश्रम करण्यासाठी जी जिद्द अंगी असावी लागते तीच या दैववादाने खच्ची केली. लढण्याची जिद्द हरपलेल्या किंवा आपल्या बचावासाठी दुसरा कुणी तरी येईल, देव तरी नक्कीच येईल, या आशेवर असलेल्या माणसाला पराभूत व्हायला वेळ लागत नाही. ही पराभूत मानसिकता वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक जोपासल्या गेली, कोणता तरी देव अवतार घेईल आणि आपले सगळे दु:ख दूर करेल, या आशेवर जगणाऱ्या सामान्य लोकांना या देवाच्या नावाखाली अक्षरश: लुबाडण्यात आले, त्यांचे शोषण केल्या गेले आणि आजही तेच सुरू आहे. 
            
भारतीय माणूस कर्माऐवजी कर्मकांडावर अधिक भिस्त ठेवणारा म्हणून ओळखला जातो. अगदी आजही *घरात शांती नांदावी, व्यवसायात प्रगती व्हावी, नोकरी लागावी, योग्य वर किंवा वधू मिळावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा, यज्ञ, होमहवन, नारायण नागबळी सारखे विधी केले जातात. अशा अतार्किक आणि अवैज्ञानिक गोष्टींनी आपल्या मेंदूचा पुरता ताबा घेतला आहे. अगदी आजही या एकविसाव्या शतकात लढाऊ विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले जाते, अंतराळ यानाची प्रतिकृती तयार करून ती एखाद्या देवाला अर्पण केली जाते आणि हे करणारे उच्चशिक्षित असतात, शास्त्रज्ञ वगैरे असतात, ही कमालीची आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. ही आपल्या बुद्धीवर चढलेली शेकडो वर्षांची जळमटे जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही.* आपल्या समोरच्या समस्या आपल्या आहेत आणि त्या आपल्यालाच सोडवाव्या लागणार आहेत, कोणताही देव वगैरे खाली उतरून त्या सोडविणार नाही किंवा कोणत्याही नवसाने, यज्ञ, पूजा, होमहवनाने या समस्या दूर होणार नाहीत, हे सामान्य लोकांनी समजून घ्यायला हवे. हाती तलवार घेऊन चाल करून येणारा शत्रू मंत्रोपचाराने परास्त होणार नाही, त्याच्याशी मुकाबला करायचा असेल तर आपल्यालाही हाती तलवारच घ्यायला हवी, त्या विद्येत पारंगत व्हायला हवे; परंतु हे अगदी साधे सत्यदेखील लोकांच्या गळी उतरत नाही, इतकी भीषण पकड या दैववादाने आपल्या मेंदूवर मिळविलेली आहे. यातून बाहेर यायलाच हवे. 
            
कर्मकांडापेक्षा कर्माचे महत्त्व लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे. सोरटी सोमनाथचे मंदिर एकदा नाही सतरा वेळा लुटल्या गेले. आपल्या भक्तांचा हा षंढपणा पाहून तो भगवंतदेखील खजिल झाला असेल. शत्रू म्हणून समोर उभे ठाकलेले आप्तस्वकीय असतील, तरी त्यांना ठार करणे हाच खरा धर्म आहे हे सांगणारा श्रीकृष्ण याच भूमीवर होऊन गेला आणि करोडो लोकांचा तो आराध्यदैवत आहे, त्याने सांगितलेली गीता करोडो लोकांसाठी आराध्य धर्मग्रंथ आहे, हा विचित्र विरोधाभासच म्हणावा लागेल. या दैववादामुळे, त्यातून जन्माला आलेल्या कर्मकांडामुळे आपण लढायचेच विसरून गेलो आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून इतका गौरवशाली इतिहास लाभलेला हा देश आज एक आर्थिकदृष्ट्या मागास देश म्हणून जगाच्या पाठीवर ओळखला जातो, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.
            
आपल्या देशात अजूनही अमुक-अमुक बाबाची पायदळ वारी करणारे, एखाद्या विशिष्ट वारी एखाद्या विशिष्ट देवाला फुले वाहिली किंवा प्रसाद चढवला किंवा नवस बोलला म्हणजे माझी सगळी संकटे दूर होतील, मला समृद्धता येईल किंवा अमुक-अमुक देवावर फुले किंवा पिंडीवर इतके बिल्वपत्रे वाहिली म्हणजे तो भगवंत मला प्रसन्न होऊन इच्छित मिळवून देईल असे समजणाऱ्या या लोकांची संख्या काही कमी नाही. या सगळ्या लोकांना एकच सांगावेसे वाटते, की ज्याला आपण शॉर्टकट, शॉर्टकट म्हणतो ते एखाद्या रस्त्यात असतील; मात्र परिश्रमाला किंवा यशाला कुठलाच शॉर्टकट नसतो, आणि जे लोक यशाकरिता शॉर्टकट घेतात ते नंतर किती अडचणीत येतात याची अनेक उदाहरणे दिल्या जाऊ शकतात. म्हणूनच म्हणतात, की *'कठोर परिश्रमाला पर्याय नाही.'* माझ्या तरुण मित्रांना, शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की, म्हटलेच आहे, की पेरणी करायची असेल आणि त्याच वेळेला घरात दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाला असेल तर *'मुडदा ठेवावा झाकून आणि पेरणी करावी वाकून'* ही आपली परंपरा आहे; मात्र दैववादाच्या आणि ईश्वरवादाच्या कच्छपी लागून आपण ही जी कर्मकांडे करतो ती खरे म्हटले म्हणजे आपल्या प्रगती मधले खरे अडथळे आहेत, हे लक्षात घेऊन आपण जर मार्गक्रमण केले तर यश निश्चित मिळतेच. केवळ पैसा असून चालत नाही, पैशाला बुद्धीची आणि परिश्रमाची जोड मिळाली, तर यश निश्चित मिळतेच हे यापुढे ध्यानात ठेवा, एवढे आपल्याला आवर्जून सांगावेसे वाटते.

सोर्स - आनंद

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा नियमावली व नोंदणी माहिती..